चंद्रपूर : बापाने पोटच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपूर शहरात हे संतापजनक प्रकरण समोर आले आहे. घरात मुलगी एकटी असताना तिच्या बापाने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, पण प्रसंगावधान राखत मुलीने बापाला बाजूला ढकलून घरातून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर मुलीने वडिलांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरात हे चार जणांचे कुटुंब राहते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्ये आहेत. ही मुलगी दहावीनंतर आईसोबत घरकाम करण्यासाठी जायची. तिचे वडील कोणतेही काम करत नाहीत. हा बाप आपल्याच मुलीवर वाईट नजर ठेवत होता. अशातच काही महिन्यांपूर्वी एक दिवस घरात मुलगी एकटीच होती. तिला एकटीला बघून नराधम बापाने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने तिच्या बापाला धक्का देऊन दूर ढकलले आणि घराबाहेर पळ काढला. तिने या घटनेबद्दल आईला सांगितले. त्यानंतर या नराधमाला घराबाहेर काढण्यात आले होते.
या घटनेनेनंतर तीन महिन्यांनी बापाने घरी फोन केला आणि अपघात झाल्याचे सांगत त्याला घरात घेण्याची विनंती केली. तसेच माफी मागत यापुढे असा प्रकार होणार नाही असे देखील सांगितले. मात्र, पुन्हा काही दिवसांनंतर या बापाने मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. तिचा विनयभंग केला, त्यामुळे अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून शुक्रवारी या मुलीने रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन वडिलांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला असून संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मुलीच्या या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.




