मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून नुकसानभरपाईचे पैसे मिळायला सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. पदवीधर शिक्षक मंडळाच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना मदत देण्यात अडथळा येत होता. मात्र, राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात आज पत्र पाठवले आहे. उद्यापर्यंत त्यांच्याकडून मदतीचे वाटप करण्यासाठी परवनागी मिळेल. त्यामुळे सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खातात पैसे वळते व्हायला सुरुवात होईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आता रब्बी पिकांसाठी पेरणी करायची असल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. यापूर्वीही निवडणूक आचारसंहितेच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्यात आली होती. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या रक्कमेचे वाटप करण्यात कोणताही अडथळा येणार नाही, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.