मुंबई : राज्यात कोरोनाला आळा घालायचा असेल तर गर्दी टाळलीच पाहिजे, यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टी बंद करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. पण राज्यात तुर्तास लॉकडाऊनची गरज नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत टास्क फोर्स आणि आरोग्य खात्याची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राजेश टोपे यांनी यावेळी ऑग्युमेंटेंड रिस्ट्रिक्शनविषयी सूतोवाच केले. कोरोनाला आळा घालण्यासाठी टास्क फोर्सने ऑग्युमेटेंड रिस्ट्रिक्शनचा पर्याय सुचवला आहे. याचा अर्थ आपल्याला अनावश्यक सेवा किंवा गोष्टी बंद करण्याचा विचार करावा लागेल. ज्या गोष्टींमुळे दैनंदिन जीवनात काही अडणार नाही, अशा अनावश्यक गोष्टी बंद करण्यासंदर्भात चर्चा झाली. बैठकीतील सगळे निष्कर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येतील. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
टोपे म्हणाले की आगामी काळात कोरोना चाचणीसाठी आरटीपीसीआर टेस्टऐवजी अँटिजेन टेस्टचा वापर वाढला पाहिजे. एखादी व्यक्ती अँटिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आली तर पुन्हा तिची आरटीपीसीआर टेस्ट करु नये. तसेच अँटिजेन चाचण्यांचा रिपोर्ट कोव्हिन पोर्टलवर जात नाही. त्यामुळे संबंधितांनी याची माहिती स्वत:हून जिल्हाधिकाऱ्यांना दिली पाहिजे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.
- राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता. विकेंड लॉकडाऊनच्या काळात गार्डन, चौपाट्या आणि धार्मिकस्थळे पूर्णपणे बंद राहतील.
- विकेंड लॉकडाऊनच्या काळात धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांनाही बंदी
- सोमवार ते शुक्रवारी रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदी लागू राहील.
- शाळा, महाविद्यालये आणि पर्यटनस्थळांच्या परिसरात जमावबंदी




