पुणे : पुण्यातील कसबा मतदारसंघातून निवडून येत जायंट किलर ठरलेले, काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आज पुण्यात पत्रकार परिषदेत आपला निर्णय जाहीर करताना धंगेकर यांनी शिवसेनेत (शिंदे गट) सामील होण्याचे संकेत देत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना धंगेकर यांनी स्पष्ट केले की त्यांचा राजीनामा काँग्रेसबद्दलच्या वैयक्तिक असंतोषामुळे नाही तर सत्तेबाहेर काम करण्याच्या आव्हानांमुळे आहे. त्यांनी सांगितले कि, “माझी नाराजी काँग्रेस पक्षावर नाही. काँग्रेस सोडल्याचे मला दुःख आहे. परंतु, सत्तेत असल्याशिवाय काम होत नाही ही कार्यकर्त्यांची आणि मतदारांची भावना होती. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने मला भरभरून दिले. पक्ष सोडणे हा एक कठीण निर्णय होता, परंतु मी माझ्या कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी चर्चा करून तो घेतला. माझी कोणावरही नाराजी नाही असे सांगतानाच ते हेदेखील म्हणाले की, सत्ता अनेक वर्ष पाहिली पण सत्तेचा लाभ मिळाला नाही.”
धंगेकर म्हणाले की, आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक होणार असून त्यानंतर अपेक्षित निर्णय घेतला जाणार आहे. एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी त्यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधला आणि त्यांना त्यांच्या गटात सामील होण्याचे आवाहन केले, असेही त्यांनी सांगितले. शिंदे माझ्याबद्दल आधीही बोलले होते आणि उदय सामंत यांनी मला फोनही केला होता. त्यांनी मला त्यांच्यासोबत काम करण्यास सांगितले. मी त्यांच्याकडे कोणतेही पद मागितले नाही. मी महानगर पालिका निवडणूक लढवणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
धंगेकर यांचे काँग्रेसमधून बाहेर पडणे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षासाठी आणखी एक धक्का मानला जात आहे. शिवसेनेशी (शिंदे गट) जुळवून घेण्याचा त्यांचा निर्णय आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी पक्षावर आणखी परिणाम करू शकतो.
रविंद्र धंगेकर यांची राजकीय कारकीर्द
रविंद्र धंगेकर यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरु झाली, ते १९९७ – २००६ या काळात शिवसेनेत होते. २००६ ते २०१७ या ११ वर्षाच्या काळात ते मनसे मध्ये होते. २०१७ ला ते पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांना या निवडणुकीत काँग्रेसने मदत केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०२३ मध्ये कसबा या भाजपच्या बालेकिल्ल्यात पोटनिवडणुकीत विजय मिळवला. २०२४ ला काँग्रेस पक्षाने त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघांची उमेदवारी दिली होती मात्र त्यांचा मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पराभव केला होता.