मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत दहावीनंतर तांत्रिक पदविका अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धोरण निश्चित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
समितीचे सदस्य सचिव म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, जि. रायगडचे कुलसचिव असतील. समितीत अन्य 5 सदस्य असतील. समितीने अहवाल शासनास तीन महिन्यात सादर करावा, असे म्हटले आहे.
समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे :
- दहावीनंतर तांत्रिक पदविका अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यासाठी असलेल्या धोरणाचा आढावा घेऊन आवश्यक असल्यास सुधारीत धोरणाची शिफारस करेल.
- उद्योगांसाठी आवश्यक असणारे पदविकास्तरीय कुशल मनुष्यबळ, रोजगार वाढीचा दर, तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्याची उपलब्ध संख्या आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील रिक्त जागा यासाठी सदर समिती बृहत योजना तयार करेल.
- समिती अभियांत्रिकी शिक्षणासह तंत्रनिकेतन शिक्षण यामधून पदवी/पदविका प्राप्त करून बाहेर पडणाऱ्या कुशल मनुष्यबळाची उद्योगांना आवश्यक असणारी आवश्यकता यामधील ताळमेळ साधण्याबाबतची यंत्रणा कशी असावी, याचा आराखडा तयार करेल.
- यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून शासनास शिफारस करेल.
- डॉ. माशेलकर समितीच्या अहवालातील मुद्यांशी संबंधित शिफारशींचाही समिती विचार करून मार्गदर्शक सूचना निश्चित करेल.




