मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा असे आदेश दिले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना याबाबतचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत वाढता कोरोना, रुग्णसंख्या, मृत्यूदर यांसह इतर गोष्टींवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले :
- लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे, त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे
- लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे
- कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेका रुग्णांच्या संपर्कातले किमान 20 जण तरी शोधलेच पाहिजेत
- सर्व व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत त्यामुळे तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे. जणू काही कोरोना संपला असे सगळे वागत आहेत.
- आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवून राज्याचा आरोग्य नकाशा तयार केला. यातील सह व्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करा
- ज्या ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉक डाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्या
- जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा
- गेले वर्षभर आपण कोरोनाशी लढतांना विविध क्षेत्रांसाठी नियम ( SOP) ठरविली, मात्र त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही हे गंभीर आहे.
- इतके दिवस थांबलेले लग्न समारंभ सुरू झाले आहेत, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमविना होतांना दिसतात. उपहारगृह, हॉटेल्सच्या वेळा आपण वाढविल्या आहेत, मात्र नियमांचे पालन होतांना दिसत नाही. स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन तत्काळ कारवाई करावी.
- ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कडक कारवाई प्रसंगी करावी.
- लोकांमध्ये बेफिकिरी आली असली तरी स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून कर्तव्यात ढिलाई नको.
- सार्वजनिक ठिकाणी पालिकांनी जंतुनाशक फवारणी नियमित सुरू करावी
- गावागावात जाऊन फिरत्या वाहनाद्वारे लोकांच्या चाचण्या वाढवा
- ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू आहेत का याची खात्री करा. ही सुविधा वापरण्याची वेळ येऊ नये पण तयारीत राहा




