मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात वांद्रे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी चौकशीसाठी वांद्रे पोलिसांनी कंगना आणि रंगोलीला समन्स बजावले आहेत. कंगनाला 10 नोव्हेंबर रोजी तर, रंगोलीला 11 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर रहायचे आहे.
कंगनावर वादग्रस्त वक्तव्ये करुन समाजामध्ये तेढ पसरवल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी वांद्रे न्यायालयाने पोलिसांना कंगना रानौत हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता पोलिसांना कंगनाच्या चौकशीची मुभा मिळाल्याने तिच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कंगना रनौत हिने बॉलीवूड इंडस्ट्रीवर टीका करताना याठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी मुक्ताफळे कंगना रनौत हिने उधळली होती. या पार्श्वभूमीवर मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. पोलीस कंगना रनौत हिच्यावरोधात तक्रार दाखल करुन घेत नसल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते.
अभिनेत्री कंगना रनौत वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडला घराणेशाही आणि कंपूबाजीबद्दल बोलत असते, असेही याचिकेत सांगण्यात आले होते. यानंतर वांद्रे न्यायालयाने कंगना रनौत हिच्यावरोधात धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.