Importance of pulses and agricultural festivals
अमरावती महाराष्ट्र

भरडधान्यांचे महत्त्व आणि कृषी महोत्सव

खाद्यसंस्कृती ही प्रदेशाची रचना, भौगोलिक स्थिती, हवामान, पाणी, पीकपद्धती यातून आकाराला येते. प्रदेशात, परिसरात पिकणारी अन्नधान्ये हीच त्या भागातील नागरिकांच्या आहाराचा मुख्य भाग असतात. महाराष्ट्रात पीकपद्धतीत वैविध्य आढळते. त्यानुसार भात आणि भाकरी किंवा पोळी खाल्ली जाते. त्यातही पूर्वी ज्वारीच्या भाकरी हा आपल्या आहाराचा प्रमुख घटक होता. नंतर त्याची जागा गव्हाच्या पोळीने घेतली. पूर्वी प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यानुसार ज्वारी, बाजरी, तांदळाची किंवा नाचणीची भाकरी आवडीने खाल्ली जात असे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कष्टकरी माणसांचा भाकरी हा हक्काचा आहार होता. नंतर गव्हाचा समावेश झाला. त्यात बेकरी पदार्थ वाढले. केबल टीव्हीवरील जाहिरातींच्या माध्यमातून निरनिराळ्या पदार्थांचा आहारात समावेश झाला. चायनीजच्या गाड्या खेडोपाडीही सुरू झाल्या. जंक फूडच्या चटकेपोटी आरोग्य बिघडत असल्याचे दिसू लागले. हे असे असताना पुन्हा एकदा भरडधान्याकडे वळण्याची गरज भासू लागली. त्यामुळेच ज्वारी, बाजरी, नाचणी या भरडधान्यांची पुन्हा मागणी वाढू लागली आहे. पाश्चिमात्य देशांमध्येही भरडधान्यांचा आहारात समावेश होऊ लागला आहे.

भरडधान्यांची पौष्टिकता उत्कृष्ट आहे. त्यात प्रथिने, तंतूमय पदार्थ, खनिज पदार्थ, जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. ती सावकाश व हळुवारपणे पचविली जातात. सहज पचण्याच्या गुणधर्मामुळे मधुमेह व लठ्ठपणा हे विकार असणाऱ्या लोकांना त्यांचा चांगला उपयोग होऊ शकतो. ज्वारी, बाजरीबरोबरच राळा, नाचणी, वरी असे भरडधान्याचे विविध प्रकार आढळतात. त्यात ग्लुटेन नसते व तंतूमय घटक, प्रथिने चांगली असतात. रक्तशर्करा व कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी ते उपयुक्त आहेत. या गुणांमुळेच लोक पुन्हा भरडधान्याकडे वळू लागले आहेत. चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्यांना अन्नाचा पर्याय बनविणे काळाची गरज आहे.

हे लक्षात घेऊनच केंद्र शासनाने संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक अन्न आणि शेती संस्थेला यंदा आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करण्याचा प्रस्ताव दिला. तो मंजूर होऊन संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले. हाच धागा पकडून अमरावती जिल्हा प्रशासन व कृषी विभागातर्फे दि. 1 ते 5 मार्चदरम्यान आयोजित जिल्हा कृषी महोत्सवात भरडधान्यांचा स्वतंत्र विभागच असणार आहे. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांच्याकडून सर्व विभाग व विविध संस्थांच्या माध्यमातून जय्यत पूर्वतयारी होत आहे.

भरडधान्ये मानवी शरीराला लागणारे पोषक घटक पुरवतात म्हणून त्यांना सुपरफूड म्हटले जाते. या पिकांचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शुष्क प्रदेशात किंवा कोरडवाहू प्रदेशातही भरडधान्यांची लागवड शक्य आहे. बाजरीत सल्फरयुक्त ॲमिनो ॲसिड असल्याने लहान मुले आणि गर्भवती मातांसाठी उपयुक्त असते. नाचणीमध्ये इतर पदार्थांच्या तुलनेत सर्वांत जास्त कॅल्शिअम आहे. त्यामुळे ते वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असते. स्निग्ध पदार्थ अत्यंत कमी असल्याने व ग्लुटेन नसल्यामुळे नाचणी आरोग्याला हितकारी असते. वरईमध्ये कमी कॅलरी असतात. स्थूलता कमी करण्यासाठी ते उपयुक्त असते.

आहार साखळीत मिलेटचे स्थान परत मिळवण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने मिलेटचे प्रमाण व पर्यायी मिलेट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे. भारत हा जगातील पौष्टिक तृणधान्य पिकवणारा मुख्य देश आहे. पौष्टिक तृणधान्याची खाद्यसंस्कृती येथील जुनी परंपरा आहे. कमी दरात सहज उपलब्ध होणा-या जंक फूडच्या ठिकाणी मिलेट फूड उपलब्ध करून देण्याचे आव्हान आहे. त्यामुळे तृणधान्याला चांगली बाजारपेठ मिळेल. तृणधान्याच्या उत्पन्न व उत्पादन वाढीमुळे शेतक-यांनाही लाभ होईल. तृणधान्यापासून तयार केलेले पोषक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी देशांतर्गत व परदेशी बाजारातील मागणी वाढण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत.

यानिमित्त अमरावतीत होऊ घातलेला कृषी महोत्सव हा आपल्याला आपल्या जुन्या खाद्यपरंपरेला उजाळा देणारा आणि निरनिराळ्या भरडधान्यांचे महत्त्व पटवून देणारा ठरणार आहे.

– हर्षवर्धन पवार

जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत