अमरावती : बिहारच्या एका व्यापाऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. स्थानिक गजानन साखरवाडे यांच्या शेतातील विहिरीच्या जवळ शेतमालकाला हा मृतदेह आढळून आला. २२ ऑगस्टच्या सायंकाळी ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेतील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
राकेशकुमार रामदास पासवान रा. लालगंज, जिल्हा पाटणा (बिहार) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो गुजरात येथे कुटुंबियांसह राहत असल्याची माहिती मिळाली आहे. नांदगाव पेठ पोलिसांना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास माहिती मिळाली की एक बेवारस कार दोन दिवसांपासून चिखलात अडकून पडलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या कारची तपासणी केली. त्यांना तेथून जवळच असलेल्या साखरवाडे यांच्या विहिरीजवळ राकेश कुमारचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.
व्यापारी राकेशकुमार यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांचा मृतदेह साखरवाडे यांच्या शेतातील विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु आरोपीला मृतदेह विहिरीत ढकलता न आल्यामुळे त्याने तो तिथेच सोडला आणि पसार झाला. नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.




