भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे. अजूनही गुन्हा नोंदवण्यात आला नसून तपासासाठी वानवडी पोलिसांना आणखी कुणाचे लेखी आदेश हवेत?, असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचबरोबर पुणे पोलिसांकडून तपास काढून घेण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी यावेळी केली आहे.
काही वेळापूर्वीच चित्रा वाघ वानवडी पोलिसांना भेटल्या. यावेळी चित्रा वाघ आणि वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांच्या तपासात संदिग्धता असून पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास काढून एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पुणे पोलिसांनी आतापर्यंत अरुण राठोडची चौकशी केलीच नाही, चौकशी केल्याच्या बातम्या खोट्या आहेत, असा गंभीर आरोपही चित्रा वाघ यांनी केला आहे.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण राहत होती त्या इमारतीची पाहणी केली. यावेळी त्या म्हणाल्या, पूजा चव्हाण राहत होती तो फ्लॅट सील आहे. आम्ही त्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटची पाहणी केली. गॅलरीतील ग्रीलची ऊंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली? का तिला खाली ढकलले गेले? हे प्रश्न कायम आहेत.




