अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर संग्राम जगताप यांची बीएमडब्लू कार आणि एसटीची धडक झाली, या अपघातात संग्राम जगताप यांच्या कारचा चक्काचूर झाला. मात्र, सीट बेल्ट लावलेला असल्याने आणि कारमध्ये अत्याधुनिक सुरक्षा असल्याने जगताप व त्यांचा चालक सुखरूप बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5.30 वाजेच्या दरम्यान पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर मुंबईपासून काही अंतरावर रसायनी जवळ हा अपघात घडला आहे. जगताप यांच्या गाडीच्या पुढे एक एसटी बस जात होती. ती तिसऱ्या लेनमधून जात होती. मात्र पुढे रस्ता बंद असल्याचे लक्षात आल्यावर एसटी चालकाने अचानकपणे लेन बदलून गाडी थेट पहिल्या लेनमध्ये आणली. लेन बदलून अचानक एसटी बस पुढे आल्याने जगताप यांचा चालक गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यामुळे कार बसवर मागील बाजूने धडकली. आमदार संग्राम जगताप अपघाताच्या वेळी गाडीमध्ये होते. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.
आज पहाटे ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यादरम्यान रसायनीजवळ बस आणि कारचा अपघात झाला यात जगताप यांना कोणतीही इजा झालेली नाही. अपघाताची माहिती कळताच पोलीस मदतीला आले. त्यानंतर दुसऱ्या वाहनातून जगताप पुढे रवाना झाले. आता ते मुंबईला पोहोचले आहेत आणि त्यांनी कामही सुरु केले आहे.




