अहमदनगर : संगमनेर शहरात गुरुवारी दिल्ली नाका परिसरात गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. राधाकृष्ण विखे यांनी या घटनेचा निषेध केला होता. तसेच संगमनेर तालुक्यात लोकप्रतिनिधीचा वचक राहिला नाही, अशी टीका देखील त्यांनी केली होती.
बाळासाहेब थोरात यांनीही आता संगमनेरमधील घटनेसंबंधी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, ‘ही घटना दुर्दैवी आहे. असे घडायलाच नको होते, असे आपले मत आहे. पोलिस आणि प्रशासन शेवटी जनतेच्या आरोग्यासाठीच काम करीत आहेत. त्यांचे काम ते करीत असताना त्यांना अशी वागणूक देणे चुकीचे आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्या दृष्टीने पोलिसांनी काम करावे.”
यावेळी राधाकृष्ण विखेंच्या टीकेबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, “विखे पाटील काय बोलतात याला फार महत्त्व देत जाऊ नका. ते विरोधी पक्षाच्या भूमिकेतून नैराश्यातून बोलत असतात. त्यांच्या मतदारसंघात कधी चुकीचे काही घडत नाही, असे नाही. शेवटी मानवी स्वभाव आहे. विखे यांचे बोलणे नैराश्यातून येत असते. त्यामुळे त्यांना मीडियाने फार महत्त्व देऊ नये, असे माझे मत आहे.”




