पुणे : आजकाल अनेकांना दिवसभर सतत थकवा आणि सुस्ती जाणवते. पुरेशी झोप घेतल्यावरही ऊर्जा कमी वाटत असल्यास, यामागे तुमच्या दैनंदिन जीवनशैलीतील काही सवयी कारणीभूत असू शकतात. धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही. चुकीचा आहार, अनियमित झोप, कमी हालचाल आणि जास्त स्क्रीन टाइम ही दिवसभर थकवा आणि सुस्तीची मुख्य कारणं आहेत.
ऑफिस कर्मचारी, विद्यार्थी, रात्री उशिरापर्यंत काम करणारे तरुण, मोबाईल/लॅपटॉपवर जास्त वेळ घालवणारे लोक आणि गृहिणी – हे सर्व दिवसभर सतत थकवा अनुभवतात. गृहिणींमध्ये घरकाम, स्वयंपाक, मुलांची काळजी आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे थकवा आणि सुस्ती अधिक जाणवते.
या छोट्या सवयी करतील मदत :
सकाळची योग्य सुरुवात
- सकाळी उठल्यानंतर लगेच एक ते दोन ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि चयापचय सुधारतो.
- त्यानंतर 10–15 मिनिटे हलका व्यायाम, स्ट्रेचिंग किंवा थोडी चाल केल्यास शरीर आणि मेंदू सक्रिय राहतात.
- सकाळच्या सूर्यप्रकाशात 10–15 मिनिटे वेळ घालवणे देखील ऊर्जा वाढवते आणि व्हिटॅमिन D मिळण्यास मदत करते. व्हिटॅमिन D कमी असल्यास थकवा जास्त जाणवतो.
नाश्ता आणि आहाराचे महत्त्व
- सकाळचा नाश्ता वगळू नका. प्रोटीनयुक्त पदार्थ, फळे आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश दिवसभर स्थिर ऊर्जा देतो. जास्त साखर किंवा जंक फूड टाळल्यास थकवा कमी होतो.
- मधल्या वेळेस प्रोटीनयुक्त हलके स्नॅक्स (बदाम, काळा हरभरा, फळं) घेणे शरीराची ऊर्जा कायम ठेवते.
कॅफीन आणि पेय पदार्थ नियंत्रित करणे
जास्त कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्समुळे थकवा वाढतो. हळूहळू पाणी जास्त पिणे आणि कॅफीन नियंत्रित करणे फायदेशीर ठरते.
पाणी, स्क्रीन टाइम आणि विश्रांती
- पुरेसे पाणी न पिल्यामुळे डिहायड्रेशन होऊन थकवा, डोकेदुखी आणि चक्कर येऊ शकते. मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीवर सलग काम केल्यास मेंदूवर ताण येतो.
- दर 30–40 मिनिटांनी काही मिनिटांची विश्रांती घेणे गरजेचे आहे. उभे राहा, हलके चालत जा, 10–15 सेकंद डोळे मिटा आणि पाणी प्या. यामुळे शरीर आणि डोळे दोन्ही ताजेतवाने राहतात.
- डोळे मिटणे, खोल श्वास घेणे, किंवा हलके स्ट्रेचिंग फायदेशीर.
झोप आणि मानसिक ताजेतवानेपणा
दररोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे शरीराला स्थिरता देतात. सात ते आठ तासांची दर्जेदार झोप घेतल्यास शरीर पुन्हा ऊर्जा साठवते. ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान, संगीत ऐकणे किंवा शांत वेळ घालवणे फायदेशीर ठरते.
सकारात्मक मानसिक सवयी
नकारात्मक विचार कमी करण्यासाठी छोटा “gratitude break” – झोपण्याआधी दिवसभराच्या चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची सवय लावा.
सर्वात महत्वाचे, दिवसभर येणारा थकवा गंभीर आजार नसून दैनंदिन सवयींचा परिणाम असू शकतो. काही सोप्या बदलांनी दिवसभर ऊर्जा वाढवता येते आणि पर्यायाने कामात अधिक एकाग्रता येते.




