सेक्स किंवा शारीरिक संबंध ठेवल्याने पती-पत्नीमधील संबंध मजबूत होतात. पण महिलांनी आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी शारीरिक संबंधानंतर काही कामे करणे गरजेचे असते. स्त्रीचे लैंगिक आरोग्य योग्य ठेवण्यासाठी ही कामे अत्यंत महत्वाची असतात. बहुतेक स्त्रियांना या महत्वाच्या गोष्टीबद्दल माहिती नसते, त्यामुळे त्यांचे लैंगिक आरोग्य आणि लैंगिक जीवन बिघडू शकते. त्यामुळे या टिप्स तुम्हाला निरोगी लैंगिक जीवनात फार मदत करतील.
महिलांनी सेक्स नंतर काय करावे?
संभोगानंतर नेहमी लघवी करावी
महिलांमध्ये लैंगिक आरोग्य राखण्यासाठी महिलांनी नेहमी संभोगानंतर लघवी करावी. कारण, लैंगिक संबंध ठेवताना संक्रमणाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लघवीद्वारे हानिकारक जीवाणू आणि बुरशी काढून टाकणे आवश्यक असते.
प्रायव्हेट पार्टच्या सभोवतालची त्वचा पाण्याने स्वच्छ करावी
संभोगानंतर अनेकदा महिला जननेंद्रियामध्ये सूज आणि जळजळीची तक्रार करतात. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी, महिलांनी संभोगानंतर प्रायव्हेट पार्टच्या सभोवतालची त्वचा पाण्याने (शक्य असल्यास कोमट पाण्याने) स्वच्छ धुवावी. जननेंद्रियाच्या आत मात्र पाणी जाऊ देऊ नये.
प्रायव्हेट पार्टच्या सभोवतालची जागा कोरडी करा
अंतर्वस्त्र परिधान करण्यापूर्वी प्रायव्हेट पार्टच्या सभोवतालची पाण्याने स्वच्छ केलेली त्वचा व्यवस्थित कोरडी करा. यामुळे संसर्गाचा धोका उद्भवणार नाही.
पाणी प्यावे
शारीरिक संबंध ठेवल्यानंतर महिलांनी पुरेसे पाणी प्यावे. कारण लैंगिक संबंध हा एक प्रकारचा व्यायाम आहे, ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होते. संभोगानंतर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट होईल आणि लघवी येण्यास मदत होईल.
दही, योगर्ट खावे
शक्यतो, शारीरिक संबंध ठेवल्यानंतर स्त्रियांनी दही, योगर्ट यासारखे प्रोबायोटिक्स अन्न खाणे फायदेशीर ठरते. कारण, त्यात महिलांच्या जननेंद्रियासाठी फायदेशीर ठरणारे जीवाणू असतात. तसेच यामुळे यीस्ट संसर्गाचा धोका कमी होतो.
या गोष्टी करू नका
संभोगानंतर जननेंद्रियाच्या संपर्कात सुगंधी वाइप्स आणि साबण यांचा वापर कधीही करू नये. यामुळे पुरळ, खाज आणि संसर्गाचा धोका उद्भवू शकतो.




