तालिबान : बुरखा परिधान न केलेल्या एक महिलेला तालिबानी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वृत्तानुसार, नाजनीन नावाची २१ वर्षीय महिला बल्ख जिल्हा केंद्राकडे जात होती, यावेळी तालिबानी दहशतवाद्यांनी तिला अडवून कारमधून बाहेर ओढलं आणि त्यानंतर तिची गोळ्या घालून हत्या केली. तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदने या घटनेचे खंडण केले आहे.
तालिबानकडून अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या भागांवर कब्जा मिळवण्याचे प्रयत्न केले जात असून, मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. तसेच, तालिबान दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमधील नव्या क्षेत्रांवर ताबा मिळवल्यानंतर महिलांवर जाचक कायदे लागू केले आहेत. बल्ख हे उत्तरेतील अशांत क्षेत्र आहे, जिथे तालिबान अनेक भागांमध्ये सक्रीय आहे.
तालिबानी राजवटीत, महिलांना त्यांचं शरीर आणि चेहरा बुरख्याने झाकावा लागत होता आणि त्यांना शाळा, काम किंवा पुरूष नातेवाईक बरोबर असल्याशिवाय घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली होती. तर, व्यभिचाराचा आरोप असलेल्या महिलांना मैदानात दगड मारून मारलं गेलं. आता तालिबानकडून २२३ जिल्ह्यांमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले आहे, जिथे त्यांनी हे जाचक कायदे पुन्हा लागू केले आहेत.




