नवी दिल्ली : चीनचे अनियंत्रित झालेले रॉकेट अखेर कोसळले आहे. काहीवेळापूर्वीच या रॉकेटचे अवशेष अरबी समुद्रात कोसळल्याचे वृत्त आले आहे. या रॉकेटचे बहुतेक घटक पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केल्यावर नष्ट झाले होते. आता हे रॉकेट समुद्रात कोसळल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
29 एप्रिल रोजी चीनकडून हे रॉकेट अंतराळात सोडण्यात आले होते. हे रॉकेट अंतराळात स्पेस स्टेशन बांधण्यासाठी साहित्य घेऊन जात होते. मात्र, तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या रॉकेटने पृथ्वीच्या दिशेने उलटा आणि अनियंत्रित प्रवास सुरु केला होता. हे रॉकेट पृथ्वीवर कोसळल्यास मोठे नुकसान होईल, अशी शक्यता चिनी माध्यमांनी वर्तविली होती. मात्र, पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर हे रॉकेट नष्ट झाले आणि त्यानंतर रॉकेटचे तुकडे समुद्रात जाऊन कोसळले.
#UPDATES A large segment of a Chinese rocket re-enters Earth’s atmosphere and disintegrates over Indian Ocean, state TV reports citing the China Manned Space Engineering Office, following fevered speculation over where the 18-tonne object would come down pic.twitter.com/IqWteTQ6sz
— AFP News Agency (@AFP) May 9, 2021
अंतराळात रॉकेटचा मुख्य भाग फिरत होता. हाच भाग पृथ्वीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. रॉकेटचा हा भाग जवळपास 100 फूट लांब होते. याचे वजन तब्बल 21 टन होते. मात्र, पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना या रॉकेटचे तुकडे झाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या रॉकेटचे काही अवशेष अरबी समुद्रात कोसळले आहेत.
पृथ्वीवर पडणाऱ्या या रॉकेटचे नाव लॉन्ग मार्च 5-बी वाय-2 (Long March 5B Y2 Rocket) असे होते. सध्या हे रॉकेट पृथ्वीच्या बाजूने लो-अर्थ ऑरबिटमध्ये फिरत होते. हे रॉकेट पृथ्वीभोवती तब्बल 25,490 किलोमीटर प्रतितास म्हणजेच एका सेकंदाला 7.20 किलोमीटर एवढ्या गतीने फिरत होते.




