कराची : पाकिस्तानातील कराची विद्यापीठात भीषण स्फोट झाला आहे. पाकिस्तानच्या जिओ न्यूजनुसार, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटात तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात दोन महिलांचा समावेश आहे. तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
मस्कन चौरंगीजवळ एका व्हॅनमध्ये ‘सिलेंडरचा स्फोट’ झाला, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप या स्फोटाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी या घटनेची दखल घेतली असून दहशतवाद विरोधी विभाग आणि एसएसपी पूर्व यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. शाह यांनी जखमींना दाऊ युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्याच्या सूचना दिल्या आणि कराचीच्या आयुक्तांना अहवाल सादर करण्यास सांगितले.




