लंडन : ब्रिटिश एअरवेजच्या एका विमानाचा मोठा अपघात टळला. ब्रिटिश एअरवेजचे बोईंग ७७७ हे विमान हवेत उड्डाण घेत असताना एक मोठा बर्फाचा तुकडा विमानाच्या ‘विंडस्क्रीन’ काचेवर येऊन धडकला. बर्फाचा तुकडा काचेवर धडकल्यानंतर बोईंग ७७७ या विमानाच्या दोन इंच जाड विंडस्क्रीनला तडा गेला. या विमानात तब्बल २०० प्रवासी होते. हे विमान ख्रिसमसच्या दिवशी लंडनच्या गेटविक पासून कोस्टारिकाच्या सान जोसकडे निघाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानाच्या वर उडणाऱ्या दुसऱ्या एका विमानातून हा बर्फाचा तुकडा कोसळला होता. ही घटना घडली तेव्हा अपघातग्रस्त विमान ३५ हजार फुटांच्या उंचीवर उडत होतं. तर दुसरं विमान या विमानाच्या जवळपास एक हजार फूट अधिक उंचीवर उड्डाण घेत होतं. बर्फाचा तुकडा काचेवर धडकल्यानंतर विंडस्क्रीनला तडा गेला. विशेष म्हणजे, विमान हवेत उंचावर उड्डाण घेत असताना अत्याधिक दबावातही या काचा टिकतात.
विमानाच्या अपघातानंतर आपात्कालीन लँडिंग करावं लागलं, त्यानंतर विमानाची काच दुरुस्त करण्यासाठी अधिक वेळ लागला आणि ठरलेल्या वेळेपेक्षा ५० तास उशिराने हे विमान पुन्हा एकदा आपल्या ठरलेल्या मार्गावर रवाना झाले. तोपर्यंत प्रवासी विमानतळावर अडकून पडले होते. ब्रिटिश एअरवेजनं प्रवाशांची माफी मागितली, परंतु, ख्रिसमसच्या दिवशी ही घटना घडल्याने प्रवाशांची मात्र निराशा झाली.




