कोल्हापूर : राधानगरी धरणाचा दरवाजा अडकल्याने बंद होत नसल्यामुळे कोल्हापुरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. तांत्रिक कामासाठी उघडण्यात आलेला हा दरवाजा जवळपास १८ फुटाने उघडला गेला आहे. त्यामुळं पंचगंगा, भोगावती नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जलसंपदा विभागातील तांत्रिक विभागातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने राधानगरी धरणाकडे रवाना झाले आहे. नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला असून पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अडकलेला धरणाचा दरवाजा बंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.
सध्या कोल्हापुरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून हा तांत्रिक बिघाड लवकर दुरुस्त न झाल्यास महापूराची भीती निर्माण झाली आहे. तसेच धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने नंतर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.




