ब्रिटनच्या एका लिलाव संस्थेने महात्मा गांधींच्या चष्म्याचा २,६०,००० पौडांना (जवळपास २.५५ कोटी रुपये) लिलाव केला. हा चष्मा महात्मा गांधींनी वापरला असून नंतर तो कुणालातरी भेट म्हणून दिल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेच्या एका व्यक्तीने बोली लावून हा चष्मा विकत घेतला. हा चष्मा १०,००० ते १५,००० पौडांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, पण ऑनलाईन लिलावात बोली वाढत गेली.
लिलाव संस्थेने सांगितले की यात भारत, कतार, अमेरिका, रशिया, कॅनेडासह जगभरातील लोकांनी बोली लावली. ईस्ट ब्रिस्टल ऑक्शनच्या अँडी स्टोव्ह यांनी शुक्रवारी बोलीची समाप्ती करताना सांगितले, ‘असाधारण वस्तूची असाधारण किंमत, ज्यांनी बोली लावली त्या सर्वांचे आभार.’
स्टोव्ह यांनी सांगितले की, ईस्ट ब्रिस्टल ऑक्शनसाठी ही एक प्रतिष्ठेची गोष्ट आहे आणि त्यांनी या लिलावाला ‘शतकातील सर्वात मोठा लिलाव’ म्हटले आहे. ते म्हणाले, ‘हा चष्मा पन्नास वर्षांपर्यंत कपाटात ठेवला होता. विक्रेत्याने मला सांगितले होते की हा कुणाच्या कामाचा नसेल तर फेकून द्या. आता त्याला इतके पैसे मिळतील की त्याचे आयुष्यच बदलून जाईल.’
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दोन चष्मांचा ब्रिटनमध्ये होणार लिलाव..
या चष्म्याचे नवे मालक एक संग्राहक आहेत. नैऋत्य इंग्लंडच्या साऊथ ग्लॉस्टरशायरच्या मंगोस्टफील्डच्या एका वृद्ध रहिवाशाने हा चष्मा लिलावासाठी दिला होता. त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले होते की, त्यांच्या एका नातेवाईकांना हा चष्मा भेट म्हणून मिळाला होता जेव्हा ते दक्षिण आफ्रिकेत १९१० ते १९३० यादरम्यान ब्रिटिश पेट्रोलियममध्ये काम करत होते. चष्म्याच्या खरेपणाबद्दल स्टोव्ह म्हणाले, विक्रेत्याने जी कहाणी सांगितली ती अगदी तशीच आहे जशी त्यांच्या वडिलांनी पन्नास वर्षांपूर्वी सांगितली होती. असे मानले जात आहे की दक्षिण आफ्रिकेतील सुरुवातीच्या वर्षांमध्ये गांधीजींकडे हा चष्मा होता.




