मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन झाले आहे. मुंबईतील माहिम इथल्या निवासस्थानी वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रपट लेखक ग. रा. कामत यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.
मराठी चित्रपटसृष्टीत आणि अनेक मालिकांमध्येही रेखा कामत यांनी काम केले. चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती अभिनयाच्या या चारही क्षेत्रांत त्यांनी भरपूर काम केले असले तरी नाटक हे त्यांच्या अधिक आवडीचे होते. प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रपंच’ ही त्यांची पहिली मालिका. या मालिकेत त्यांनी साकारलेली ‘आक्का’ ही भूमिका गाजली होती. सांजसावल्या, एका लग्नाची दुसरी गोष्ट या त्यांच्या गाजलेल्या मालिका.
१९५२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘लाखाची गोष्ट’ हा रेखा यांचा पहिला चित्रपट. रेखा यांनी कुबेराचे धन, गृहदेवता, गंगेत घोडे न्हाले, मी तुळस तुझ्या अंगणी, माझी जमीन, अगंबाई अरेच्चा हे त्यांचे गाजलेले चित्रपट. नेताजी पालकर चित्रपटात त्यांनी एक लावणी नृत्य केले तर जगाच्या पाठीवर चित्रपटात बैठकीची लावणीही सादर केली. व्यावसायिक मराठी रंगभूमीवरही रेखा यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सौभद्र, एकच प्याला, भावबंधन, संशयकल्लोळ आदी संगीत नाटकांतून तसेच दिल्या घरी तू सुखी राहा, तुझं आहे तुजपाशी, लग्नाची बेडी, तरुण तुर्क म्हातारे अर्क, प्रेमाच्या गावा जावे, गोष्ट जन्मांतरीची, दिवा जळू दे सारी रात, कालचक्र आदी व्यावसायिक नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. त्यांनी विजया मेहता दिग्दर्शित यातनाघर तसेच अमोल पालेकर दिग्दर्शित पार्टी या प्रायोगिक नाटकातही काम केले.




