मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीवर लाखो रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी लाखो रुपये घेऊनही सनीनं कार्यक्रमाला दांडी मारल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलाय. या सर्व प्रकरणावर आता सनीनं स्पष्टीकरण दिलं आहे.
सनी लिओनी तिच्यावर कोची येथील एका इव्हेंट मॅनेजरने फसवणूकीची तक्रार दाखल केल्याने कायदेशीर अडचणीत सापडली आहे. मात्र, तिने या फसवणूकीच्या दाव्यांचे खंडन केले आहे. तिने कार्यक्रमाच्या संयोजकांवर चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला. ती म्हणाली कि, ‘माझी प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूनं हे आरोप झाले आहेत. असं होऊच शकत नाही की मी एखाद्या कार्यक्रमासाठी तारीख आणि वेळ निश्चित केले असेल आणि मी जाणार नाही. पण त्यांच्याकडून वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे आणि अंतिम तारीख वेळेवर निश्चित न केल्यामुळे मी कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला. या सर्व प्रकरणाला चुकीच्या पद्धतीनं लोकांसमोर सादर केलं जात आहे. ‘
आरोप खोटे व अनैतिक असल्याचे सांगून ती म्हणाली, ‘कार्यक्रमाच्या संयोजकांकडून असे निंदनीय दावे आणि अनैतिक वागणूक अतिशय त्रासदायक आहेत. मी यापूर्वीच तपास अधिकाऱ्यांना याबाबत स्टेटमेंट दिलं आहे आणि ते कार्यक्रमाच्या संयोजक व समन्वयकांचीही चौकशी करत आहेत.
काय आहे प्रकरण :
कोचीमध्ये दोन कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे सनीने कबुल केले होते परंतु, तिथं न गेल्यामुळं कार्यक्रम व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सनीवर आरोप केले आहेत. सनीला कोची येथे होणाऱ्या दोन मोठ्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी २९ लाख रुपये देण्यात आले होते. परंतु, काही कारणांमुळं ती तेथे जाऊ शकली नाही. ज्यानंतर कार्यक्रमाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सनीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. केरळ पोलिसांकडून यासंदर्भात सनीची चौकशी करण्यात आली ज्यात तिनं तिची बाजू मांडली.