चेन्नई : दीपा नावाने ओळखली जाणारी तामिळ अभिनेत्री पॉलीन जेसिका हिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ती 29 वर्षांची होती. ‘थुप्परीवलन’ आणि ‘वैथा’ मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली आंध्र-आधारित तमिळ अभिनेत्री रविवारी (18 सप्टेंबर) सकाळी चेन्नईतील तिच्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
दरम्यान, तिने तिच्या डायरीत एक संशयास्पद संदेश ठेवल्याचं सांगितलं जात आहे. दीपा गेल्या काही दिवसांपासून एकटीच राहत होती. तिने फोन कॉलला उत्तर दिले नाही, तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी तिच्या एका मैत्रिणीला तिची चौकशी करण्यासाठी पाठवले, यावेळी तिच्या मैत्रिणीला ती पंख्याला लटकलेली दिसली. त्यानंतर तिच्या मृत्यूची माहिती तिच्या कुटुंबीयांना समजली.
अभिनेत्री पॉलीन जेसिका हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. दीपाने तिच्या लव्ह लाईफमधील अडचणींमुळे जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे अनेक अहवाल सांगतात. दीपाच्या घरातून पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. अभिनेत्रीने पत्रात कोणाचेही नाव घेतलेले नाही. अहवाल असे सूचित करतात की ती एका व्यक्तीच्या प्रेमात होती आणि तिच्या नातेसंबंधात उद्भवलेल्या समस्यांचा सामना करू शकत नाही. दीपा एक नवोदित अभिनेत्री होती, ती काही चित्रपटांचा भाग आहे. या वर्षाच्या सुरुवातीला तिचा वैधा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तिने इतर चित्रपटांसह Mysskin’s Thupparivelan मध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत.




