नवी दिल्ली : कन्नड फिल्म इंडस्ट्रीकडून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड अभिनेत्री शनाया काटवे हिला हुबळीच्या पोलिसांनी अटक केली आहे. शनायावर तिच्या भावाची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शनायाचा भाऊ राकेश कटवे याचा मृतदेह वेगवेगळ्या रस्त्यांवरून ताब्यात घेतला आहे. वृत्तानुसार, पोलिसांना राकेशची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांना देवरगुडीहलच्या जंगलात राकेश कटवे यांचे चिरलेले डोके सापडले, तर मृतदेहाचे बाकीचे तुकडे हुबळी येथे वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि गदग रोडवरून मिळाले आहेत.
पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासादरम्यान नियाज अहमद कटिगार, तौसिफ छन्नापूर, अल्ताफ मुल्ला आणि अमन गिरानीवाले या चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना तपासादरम्यान या खुनामध्ये राकेशची बहीण कन्नड अभिनेत्री शनाया काटवे सहभागी असल्याची माहिती मिळाली. शनायाने तिच्या प्रेमप्रकरणातून हे सर्व केल्याचं म्हटलं जात आहे. शनाया आणि नियाज एकमेकांच्या प्रेमात होते, परंतु शनायाचा भाऊ या प्रेमप्रकरणाला विरोध करत होता. त्यातून नियाजने राकेशची हत्या करण्याचा कट रचला.
9 एप्रिल रोजी शनाया तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हुबळीला गेली होती, त्याच दिवशी ही घटना घडली. कटिगार आणि त्याच्या मित्राने राकेशची निर्घृण हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. याबद्दल माहिती मिळताच हुबळी पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला आणि शनायाला अटक केली. सध्या अभिनेत्रीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.




