मुंबई : ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर मोठी कारवाई करत तिची ७ कोटी २७ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. ही रक्कम सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला भेट म्हणून दिल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलिनकडे एवढ्या रकमेची एफडी आहे, जी ईडीने जप्त केली आहे.
ईडीच्या टीमने अभिनेत्रीची तीन वेळा चौकशीही केली आहे. तिहार तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर याच्याशी असलेल्या संबंधांबद्दल तिच्याकडे चौकशी करण्यात आली आहे. तिच्याविरोधात ईडीने लुकआऊट नोटीसही जारी केली आहे. 5 डिसेंबर 2021 रोजी देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना तिला मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन आणि सुकेश चंद्रशेखर यांच्यात जवळचे संबंध होते आणि तो जॅकलिनवर पाण्यासारखा पैसा खर्च करत असायचा. चंद्रशेखरने जॅकलिनला सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने, आयात केलेली क्रॉकरी दिली. याशिवाय ५२ लाख रुपये किमतीचा घोडा आणि ९-९ लाख रुपये किमतीच्या चार पर्शियन मांजरीही भेट म्हणून दिल्या होत्या. सुकेशने जॅकलिनसाठी अनेक चार्टर्ड फ्लाइट्स बुक केल्या होत्या. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर याने जॅकलिनवर सुमारे 10 कोटी रुपये खर्च केले होते.
सुकेशने जॅकलिनसाठी दिल्ली ते मुंबई आणि तेथून चेन्नई अशी चार्टर्ड फ्लाइट बुक केल्याचेही तपासात समोर आले आहे. जॅकलिनचा काही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याचा खर्चही सुकेशने उचलला होता. सुकेशची अंतरिम जामिनावर सुटका झाल्यानंतर या दोघांमध्ये झालेल्या तीन भेटींबाबत ईडीला ठोस माहिती मिळाली असून, यासाठी जॅकलिनची चौकशी करण्यात येत आहे.
सुकेश जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होता!
सुकेशनेही जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला आहे. दोघांची काही फोटो या दाव्याला पुष्टी देतात. मात्र, जॅकलिनने तपास यंत्रणांसमोर असे कोणतेही नाते नाकारले आहे. तिहार तुरुंगात असताना सुकेश जॅकलिनशी अनेकवेळा फोनवर बोलल्याचेही तपासात समोर आले आहे. याचे सबळ पुरावे मिळाल्यानंतर ईडीच्या पथकाने तिहार तुरुंगातही भेट दिली आहे.
जॅकलिनकडे कोटींची मालमत्ता
जॅकलिनकडे कोटींची मालमत्ता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅकलिनची जवळपास 10 मिलियन डॉलर (74 कोटी रुपये) संपत्ती आहे. जॅकलिन एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी रुपये घेते. एका अहवालानुसार, २०१९ मध्ये जॅकलिनची वर्षभराची कमाई ९.५ कोटी रुपये होती. विशेष म्हणजे नेटफ्लिक्सचा ‘ड्राइव्ह’ चित्रपट सोडला तर त्यावर्षी तिचा एकही मोठा चित्रपट प्रदर्शित झाला नाही.
‘या’ आरोपाखाली सुकेश चंद्रशेखर तुरुंगात आहे
सुकेश चंद्रशेखरशी संबंधित प्रकरणात प्रथम दिल्ली पोलिसात एफआयआर नोंदवण्यात आला होता. दिल्ली ईओडब्ल्यूने ऑगस्टमध्ये त्या एफआयआरची चौकशी सुरू केली. या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचीही चौकशी सुरू केली होती. रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग आणि मालविंदर सिंग यांना तुरुंगातून बाहेर काढण्याच्या बहाण्याने त्यांच्या पत्नींची 200 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा सुकेशवर आरोप आहे.
सुकेश कधी तो पीएम ऑफिस तर कधी गृहमंत्रालयाशी संबंधित अधिकारी असल्याचे सांगायचा. या फसवणुकीत तिहार तुरुंगातील अनेक अधिकारीही सहभागी होते. सुकेश या सर्वांना मोठी रक्कम द्यायचा. ईडीने 24 ऑगस्ट रोजी सुकेशचा चेन्नईतील सी-फेसिंग बंगला जप्त केला होता. बंगल्यातून 82.5 लाख रुपये, 2 किलो सोने आणि 12 पेक्षा जास्त आलिशान कार जप्त करण्यात आल्या होत्या.




