मुंबई : अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूदचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. सोनाली तिची बहीण आणि बहिणीचा मुलगा यांच्यासह होती. सोनालीची गाडी एका ट्रकला धडकली, पण सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. या अपघातात सोनाली सूद आणि तिच्या बहिणीचा मुलगा जखमी झाले आहेत. सध्या दोघांवरही नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात काल (२४ मार्च) घडला असून त्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. सोनाली आणि तिचा भाचा दोघांनाही तातडीने नागपूरच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. ४८ ते ७२ तास डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार आहेत. ही बातमी कळताच, सोनू सूद ताबडतोब नागपूरला रवाना झाला. आज सकाळी सोनू सूद आपल्या पत्नीला भेटण्यासाठी नागपूरला पोहोचला.
सोनाली सूद लाइमलाइटपासून दूर राहते, ती सोनू सूदच्या सामाजिक कार्यांमध्ये मदत करते. सोनू सूद आणि सोनाली यांचा १९९६ मध्ये विवाह झाला. त्यांच्या दोन मुलांची नावे अयान व इशांत आहेत. सोनाली सूद तेलुगू भाषिक असून ती आंध्र प्रदेशातील मूळ रहिवासी आहे. नागपूर विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सोनालीने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.