महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोनाच्या संकटामुळे १०वी आणि १२वीच्या ऑक्टोबर २०२० सत्रातल्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक आणि परीक्षा घेण्याची पद्धत याबद्दलची माहिती राज्यातील सद्यस्थितीचा अंदाज घेतल्यानंतरच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येईल.
पत्रकारांशी बोलताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, कोव्हिड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता आम्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील आपातकालीन परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेतल्यानंतरच या परीक्षा घेतल्या जातील. साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे २०२० मधील शैक्षणिक वेळापत्रक पूर्णपणे विस्कळित झाले आहे. या रोगापासून बचावासाठी संपूर्ण राज्यातील शाळा गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहेत आणि सर्व शैक्षणिक उपक्रम ऑनलाईन घ्यावे लागत आहेत. केंद्र सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरातील शाळा सप्टेंबर अखेरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.




