कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं राज्य सरकारनं शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आलं. शाळा कधी सुरू होणार याविषयी अखेर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली.
माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं, “३१ ऑगस्टपर्यंत राज्य सरकार शाळा सुरू करू शकत नाही. कारण केंद्रीय गृहमंत्रालय यासंदर्भातील निर्णय घेते. शाळा-महाविद्यालयांसह सर्वच गोष्टी सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय घेते. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्य सरकारला शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाली, तर प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. दहावीच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आधी दहावीचे वर्ग सुरू करू. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं इतर इयत्तांसाठी शाळा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”




