पुणे : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पालक शाळांची फी भरु शकले नाहीत. त्यामुळे अनेक शाळा आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. अशा परिस्थितीत पुण्यातील खासगी इंग्रजी शाळांचे ऑनलाईन शिक्षण 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या काळात काहींच्या नोकऱ्या गेल्या. कुणाचा पगार कमी झाला. त्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्याचे शैक्षणिक शुल्क भरु शकले नाहीत. त्यामुळे शिक्षकांचे पगार देण्यासही शाळांकडे पैसा नाही. अशा स्थितीत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे आणि पिंपरीमधील जवळपास 1 हजार 400 खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केले आहे. आजपासून गुरुवारपर्यंत ऑनलाईन शिक्षण बंद ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ स्कुल्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी पुणे आणि पिंपरीतील शाळांबाबत घेतला आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी केली आहे.
पुण्यात फी न भरल्यास ऑनलाईन शिक्षण बंद केलं जाणार आहे. यासंदर्भात पालिकेच्या शिक्षण मंडळात शनिवारी सुनावणी पार पडली. शिक्षण संचालकांसमोर पालकांनी शाळांविरोधातल्या तक्रारींचा पाढा वाचला. पालकांनी फी कमी करण्याची मागणी केली असून, शाळा 100 टक्के फी वसुलीवर ठाम असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सर्व शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.