नवी दिल्ली : एटीएममधून पैसे काढल्यानंतर बर्याचदा आपल्याला फाटलेल्या नोटा मिळतात. जर ती नोट बाजारात चालवणे अवघड झाले आणि ती कोणीही घेत नसेल तर ती घेऊन बँकेत जावं लागतं. परंतु बर्याच वेळा बँकाही ती नोट स्वीकारण्यास नकार देतात. पण असे झाल्यास आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आता आरबीआयने याबाबत लोकांच्या समस्या लक्षात घेऊन या समस्येचे निराकरण करण्याचा एक मार्ग शोधला आहे.
नियमांनुसार, एटीएममधून निघालेली फाटलेली नोट घेऊन आपण थेट बँकेत जाऊ शकता, तिथे बँकेच्या कर्मचार्यांना सांगा की ही नोट तुमच्या एटीएममधून निघाली आहे आणि तुम्ही ती बदलून घेऊ शकता. असे करून देखील बँक आपली नोट घेत नसेल तर आपण दुसरी पद्धत देखील अवलंबू शकता.
तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल आणि संपूर्ण तपशील द्यावा लागेल
तुम्हाला एटीएममधून फाटलेली नोट मिळाली असेल, तर ग्राहकाला बँकेकडून एक फॉर्म घ्यावा लागेल आणि एक्सचेंजसाठी तो माहिती भरून जमा करावा लागेल. यामध्ये तुम्हाला पैसे काढल्याची वेळ, तारीख व कोणत्या एटीएममधून पैसे काढले, त्याचा तपशील द्यावा लागेल. यासह तुम्हाला पैसे काढल्याची स्लिपही द्यावी लागेल. जर एटीएममधून स्लिप बाहेर पडली नसेल तर आपल्याला आपल्या मोबाइलवर आलेला मेसेज जोडून द्यावा लागेल.
रिझर्व्ह बँकेच्या एक्सचेंज करन्सी नियम 2017 नुसार जर तुम्हाला एटीएममधून फाटलेली नोट मिळाली असेल तर ती नोट बदलून देणे ही बँकेची जबाबदारी आहे. आरबीआयच्या नियमांनुसार, ग्राहकाला कोणतीही बँक एटीएममधून मिळालेली फाटलेली नोट स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही. यानंतरही बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास बँकेतील कर्मचार्यांवर कारवाई होऊ शकते. त्याबरोबरच बँकेला 10,000 रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो.




