पुणे : आपल्या लहान भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या एका 30 वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. मृत व्यक्तीच्या भावाचे हल्लेखोरांसोबत पूर्ववैमनस्य असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी मुख्य हल्लेखोरासह दोघांना अटक केली आहे, ज्यांच्यावर यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव सुनील सरोदे (वय ३०) असून तो पुण्यातील गुलटेकडी भागातील डायस्प्लॉट येथील रहिवासी आहे. बुधवारी पहाटे एकच्या सुमारास याच परिसरात ही घटना घडली. सरोदे यांच्या धाकट्या भावाचा आरोपींशी पूर्वी वाद होता, तेदेखील त्याच परिसरातील रहिवासी आहेत. घटनेच्या वेळी संशयित आरोपी सरोदे यांच्या लहान भावावर हल्ला करण्यासाठी आले होते. यावेळी सुनील सरोदे त्यांच्या बचावासाठी गेले, मात्र त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. आपल्या भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या मानेला गंभीर जखमा झाल्या, ज्या जीवघेण्या ठरल्या, असे स्वारगेट पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी साहिल कांबळे (24) आणि त्याचा लहान भाऊ रोहन कांबळे (21) यांना अटक केली आहे. दोन्ही भावांच्या वडिलांसह आणखी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, साहिलवर पुणे पोलिसांनी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला होता आणि 2022 मध्ये त्याची जामिनावर सुटका झाली होती.