आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील अन्नम्मय्या जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील रायचोटी शहरातील रामापुरम भागात सुब्बम्मा नावाच्या महिलेने तिच्या बहिणीची सून वसुंधरा (35) हिचा शिरच्छेद केला आणि तिचे डोके हातात घेऊन आणि चाकू घेऊन स्वत: पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. या प्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, रामापुरम परिसरात राहणाऱ्या वसुंधरा यांचा नवरा राजा यांचा दहा वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून वसुंधरा तिच्या दोन मुलांसह तिच्या पतीच्या मावशीकडे म्हणजेच मावस सासूकडे राहत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून वसुंधराचे मल्लिकार्जुन नावाच्या व्यक्तीसोबत अवैध संबंध प्रस्थापित झाले होते, त्यामुळे तिचे मावस सासू-सासरे यांच्यासोबत अनेकदा वाद व भांडण होत होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये तणाव वाढू लागला होता. पोलिसांचे म्हणणे आहे, आज सकाळी देखील दोघींमध्ये जोरदार भांडण सुरु झाले. त्यानंतर सून वसुंधरा हिने तिच्या सासूला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्या सासूला भीती वाटली की वसुंधरा तिच्या प्रियकरासह तिला ठार मारेल आणि मालमत्तेवर ताबा मिळवेल, नंतर नातवंडासाठी काहीही शिल्लक राहणार नाही.
त्यानंतर, सासूने तिच्या भावाचा मुलगा चंद्राबाबू यांच्यासह वसुंधराची निर्घृण हत्या केली आणि चाकूने तिचे डोके धडावेगळे केले. त्यानंतर हातात डोके घेऊन लोकांमध्ये रस्त्यावर चालत चालत पोलिस ठाणे गाठले आणि चाकूसह पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी महिलेला अटक करून डोके प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.




