पुणे : पुण्यातील कात्रज भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर 15 वर्षांच्या मुलीशी मैत्री झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपींविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शाळकरी मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री केली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या टेरेसवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, ही मुलगी गर्भवती राहिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक वर्षा घोगरे करीत आहेत.




