हरियाणा : फेसबुकवर झालेलं प्रेम आणि त्यानंतर झालेल्या भयंकर कृत्याची ही बातमी आहे. तरुणाने प्रेयसीला लग्न करण्यासाठी बोलावून घेतलं आणि त्यानंतर तिच्यावर त्याच्या 25 मित्रांसह सामूहिक बलात्कार केला. ही धक्कादायक घटना हरियाणाच्या पलवल जिल्ह्यात घडली आहे.
मिळालेला माहितीनुसार, एका तरुणीची फेसबुकवर एका तरुणाशी मैत्री झाली आणि त्यानंतर त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. एक दिवस तरूणाने त्या तरुणीला आपण आजच लग्न करू असे म्हणत बोलावून घेतले. ती तरुणी तयार झाली आणि लग्न करण्यासाठी त्याच्याकडे गेली. त्यानंतर तो तिला रामगडच्या जंगलात घेऊन गेला, तेथे त्याने त्याच्या 25 मित्रांसह रात्रभर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दिल्लीपासून अवघ्या 70 किमी अंतरावर असलेल्या पलवलची ही घटना आहे.
सकाळ झाल्यावर त्यांनी तिला एका रद्दीवाल्याजवळ सोडले. तिथे पुन्हा तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिची प्रकृती खालावल्यानंतर तिला बेशुद्ध अवस्थेत बदरपूर सीमेजवळ सोडून आरोपी पळून गेले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी 25 जणांविरूद्ध अपहरण आणि सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 3 मे रोजीची असल्याचे सांगितले जात आहे. तरुणीची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि जेव्हा तिला चालत-बोलता येणे शक्य झाले, तेव्हा या प्रकरणात FIR दाखल करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या पोलिस तपास अधिकारी एएसआय रचना यांनी सांगितले की, रामगड येथे राहणारा तरुणीचा मित्र सागर याने 3 मे रोजी लग्नासाठी कुटुंबीयांना भेटण्यासाठी तरुणीला होडलला बोलावले असल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर तरुणी होडलला आली. परंतु, तेथून घरी आणण्याऐवजी सागर तिला रामगड गावाजवळील एका जंगलाजवळ घेऊन गेला, जिथे त्याचा भाऊ समुद्र आणि इतर २०-२२ तरुण आधीच उपस्थित होते.
पीडित तरुणीने सांगितले की, या सर्वांनी तिला जबरदस्तीने जंगलात नेले आणि सर्वांनी तिच्यावर संपूर्ण रात्रभर बलात्कार केला. यानंतर सकाळी तिला गावाजवळील आकाश रद्दीवाल्याजवळ घेऊन गेले, तेथे आकाश व त्याच्या मित्रांनीही तिच्यावर बलात्कार केला. यावेळी ती बेशुद्ध पडली. त्यानंतर सागर आणि त्याचे तीन मित्र तिला बेशुद्धावस्थेत गाडीमध्ये बदरपूर सीमेवर घेऊन गेले आणि तिला तेथेच सोडून तेथून फरार झाले.
तरुणीने तक्रारीत सांगितले की तिची परिस्थिती अशी नव्हती की तिला चालता बोलता येईल. जेव्हा ती चालण्यास सक्षम झाली, तेव्हा तिने 12 मे रोजी हसनपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 12 मे रोजी रात्री उशिरा या तरुणीच्या तक्रारीवरून हसनपूर पोलिसांनी सागर, समुद्र आणि आकाश यांच्यासह अन्य 22 तरुणांवर अपहरण आणि सामूहिक बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून घेतले आणि पुढील कारवाई सुरू केली आहे.




