भारताने अनुभवलेले एक महान व्यक्तिमत्व: अटल बिहारी वाजपेयी

ब्लॉग

25 डिसेंबर 1924 साली तत्कालीन ग्वालियर संस्थानातील(मध्यप्रदेश) एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात श्री. अटलजींचा जन्म झाला. अटल बिहारी वाजपेयी यांचा सामाजिक जीवनातील उदय हा भारतीय लोकशाही व त्यांच्या कुशाग्र राजकीय बुद्धिमत्तेचा गौरव आहे. उदारमतवादी जागतिक दृष्टीकोन व लोकशाही तत्वांशी असलेली बांधिलकी यामुळे जनसामान्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटतो.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ब्रिटीश सत्तेला भारतातून पायउतार करण्यात महत्वाच्या ठरलेल्या 1942 मधील भारत छोडो चळवळीमध्ये सहभागी होऊन विद्यार्थीदशेतच वाजपेयी यांनी राष्ट्रवादी राजकारणाचे धडे गिरवले. राज्यशास्‍त्र व कायद्याचे विद्यार्थी असलेल्या श्री. वाजपेयींना शालेय काळातच परकीय व्यवहारामध्ये रुची निर्माण झाली होती. त्यांनी ही आवड पुढे अनेक वर्ष जोपासली व विविध द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी ह्या कौशल्याचा उपयोग केला.

श्री. वाजपेयी यांनी एक पत्रकार म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली परंतु अल्पावधीतच म्हणजेच 1951 साली भारतीय जनसंघात प्रवेश करण्यासाठी त्यांनी पत्रकारिता सोडली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्वाचा घटक असलेला भारतीय जनता पक्ष हा आधी जनसंघ म्हणून ओळखला जात होता.

लोकनेते असा नावलौकिक असलेले श्री. अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय वचनबध्धतेसाठी ओळखले जातात. 13 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान पदाची सूत्रे स्विकारली. 1996 साली थोड्या कालावधीसाठी त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पहिले होते. पंडित नेहरुनंतर सलग दोनदा पंतप्रधान होणारे ते पहिले पंतप्रधान ठरले.

ज्येष्ठ संसदपटू असलेले अटल बिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते. श्री. वाजपेयी नऊ वेळा लोकसभेवर तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून आले होते हाही एक प्रकारचा विक्रमच आहे.

महिला सबलीकरण व सामाजिक समानतेचे खंबीर समर्थक असलेले श्री. अटल बिहारी वाजपेयी भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांमध्ये एक दूरदर्शी, विकसित आणि मजबूत राष्ट्र म्हणून बघू इच्छित होते.

भारताप्रती असलेले त्यांचे निस्वार्थ समर्पण व निस्पृह सेवेबद्दल त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 1994 साली उत्कृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कारही त्यांना मिळाला होता. याच वर्षी त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला होता. २०१४ साली भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्‍न पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला . देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते.

त्यांची भाषणे अतिशय उत्तम व दर्जेदार म्हणून गणली जात. खुद्द जवाहरलाल नेहरूंनी वाजपेयी एकदिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान असतील अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता.

मे १९९८मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली ५ अणुचाचण्या केल्या. या चाचण्या जगाला, खास करून अमेरिकेला हादरवणाऱ्या ठरल्या, कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या. रशिया आणि फ्रान्स यांनी भारताच्या स्वसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी अण्वस्त्रक्षमतेचे समर्थन केले. तरी अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपीय महासंघ यांनी भारतावर अनेक क्षेत्रांत निर्बंध लादले, परंतु वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे भारताला त्यांची झळ लागली नाही.

विशेष म्हणजे अमेरिकेने लादलेल्या आर्थिक प्रतिबंधांनंतरही वाजपेयींच्या काळात भारताच्या विदेशी गंगाजळीत, व्यापारात व विदेशी गुंतवणूकीच्या रूपात शंभर हजार कोटींपर्यंत वाढ होऊन आधीच्या सरकारांच्या काळात देशाला लागलेले ‘कर्जबाजारी’ हे विशेषण गळून पडले व भारत इतर देशांना कर्ज देऊ लागला.

१९९८ च्या शेवटी वाजपेयींनी पाकिस्तान सोबत शांतता चर्चेसाठी मोठा पुढाकार घेतला. त्यांनी लाहोर-दिल्ली दरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते स्वतः पहिल्या बसमधून पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी गेले. याचे भारतात, पाकिस्तानात आणि जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद उमटले. वाजपेयीं सोबत पाकिस्तानला केवळ राजकारणी आणि मुत्सद्दीच नव्हे तर कला क्षेत्रातूनही अनेक मान्यवर गेले. कारगील युद्धानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला त्यांनी ” खेल भी जीतो और दिल भी” हा संदेश दिला होता.

श्री. वाजपेयी एक ख्यातनाम कवी होते, शिवाय आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून ते संगीत व पाक कलेतही विशेष रस दाखवत असत. त्यांच्या कविता वाचल्या कि त्यांची भावनिक उंची सहज लक्षात येते.

अटल बिहारी वाजपेयी नावाप्रमाणेच एक ज्येष्ठ भारतीय नेते, निष्णात राजकारणी, निस्पृह सामाजिक कार्यकर्ते, बलवान वक्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. जनसामान्यांच्या आशा आकांक्षा श्री. वाजपेयी यांनी पूर्ण केल्या.

२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये वाजपेयी नवव्या क्रमांकावर होते.

दीर्घ आजाराने दिल्लीच्या एम्स रूग्णालयात अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले.

महान अटल बिहारी वाजपेयी यांना शतशः नमन

“गीत नया गाता हूँ

टूटे हुए तारों से फूटे बासंती स्वर
पत्थर की छाती मे उग आया नव अंकुर
झरे सब पीले पात कोयल की कुहुक रात

प्राची मे अरुणिम की रेख देख पाता हूँ
गीत नया गाता हूँ

टूटे हुए सपनों की कौन सुने सिसकी
अन्तर की चीर व्यथा पलकों पर ठिठकी
हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा,

काल के कपाल पे लिखता मिटाता हूँ
गीत नया गाता हूँ”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत