मुजफ्फरनगर : राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते. कोरोना झाल्यानंतर गुरुग्रामच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
२0 एप्रिल रोजी अजित सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मंगळवारी रात्री प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, फुफ्फुसात संक्रमण पोहचल्यानं त्यांची प्रकृती बिघडली. त्यातच उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले.
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे पुत्र चौधरी अजित सिंह उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारघाचं प्रतिनिधित्व करत सात वेळा संसदेत दाखल झाले होते. त्यांनी केंद्रात नागरिक उड्डाण मंत्री पदाची जबाबदारीही हाताळली होती. बड्या जाट नेत्यांमध्ये चौधरी अजित सिंह यांचे नाव घेतले जायचे.
— Jayant Chaudhary (@jayantrld) May 6, 2021
राजकीय कारकीर्द :
- माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आजारी पडल्यानंतर १९८६ सालापासून चौधरी अजित सिंह यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली होती. १९८६ साली त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले.
- १९८७ ते १९८८ पर्यंत ते लोकदल (ए) आणि जनता पक्षाचे अध्यक्षही होते. १९८९ मध्ये त्यांचा पक्ष विलीन झाल्यानंतर ते जनता दलाचे सरचिटणीस झाले.
- १९८९ मध्ये अजित सिंह पहिल्यांदा बागपत मतदारसंघातून लोकसभेत दाखखल झाले. व्ही पी सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्रीपदही मिळालं.
- १९९१ मध्ये पुन्हा एकदा बागपतमधून लोकसभेत पोहचले. यावेळी नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळालं.
- १९९६ मध्ये ते तिसऱ्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेत दाखल झाले. परंतु, यानंतर मात्र त्यांनी काँग्रेस आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- १९९७ मध्ये त्यांनी राष्ट्रीय लोकदलाची स्थापना केली. १९९७ मध्ये उपनिवडणुकांत बागपत मतदारसंघातून पुन्हा निवडून येत ते लोकसभेत पोहचले. १९९८ मध्ये निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
- १९९९ मध्ये निवडणूक जिंकून ते लोकसभेत दाखल झाले.
- २००१ ते २००३ पर्यंत अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये चौधरी अजित सिंह मंत्री राहिले.
- २०११ मध्ये ते यूपीएमध्ये सहभागी झाले.
- २०११ ते २०१४ पर्यंत ते मनमोहन सरकारमध्येही मंत्री होते.
- २०१४ ते मुजफ्फरनगर मतदारसंघातून लढले परंतु, त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
- २०१९ सालीही निवडणुकीत मुजफ्फरनगरमध्ये भाजपचे उमेदवार संजीव बलियान यांनी त्यांचा पराभव केला.
शेतकरी आंदोलनाचा त्यांना फायदा मिळाला. जिल्हा पंचायत निवडणुकीत राष्ट्रीय लोकदलाला जनतेनं उचलून धरल्याचं दिसून आलं.




