नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक पार पडली. या दरम्यान, गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत चलनविषयक पतधोरण जाहीर केले. यावेळी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेटमध्ये बदल केला नसल्याने व्याजदर वाढणार नाही, ज्यामुळे EMI भरणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
महागाई दर नियंत्रणात
या बैठकीत रेपो दर, जीडीपी वाढ, महागाई आणि इतर आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, देशाचा आर्थिक विकास दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात खाद्य महागाई मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे एकूणच महागाई दरात मोठी वाढ झाली होती. डाळी, मसाले आणि भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्याने महागाई वाढली होती. मात्र, आता महागाई दर नियंत्रणात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आरबीआयने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेट 6.5% पर्यंत वाढवला होता. त्यानंतर यात कोणताही बदल झालेला नाही. चलनविषयक धोरणाची बैठक दर दोन महिन्यांनी होते. या आर्थिक वर्षाची पहिली बैठक एप्रिलमध्ये झाली. तर गेल्या आर्थिक वर्षात रेपो दरात 6 वेळा 2.50% ने वाढ करण्यात आली होती.
RBI गव्हर्नर म्हणाले की सर्व एमपीसी सदस्य पॉलिसी दर स्थिर ठेवण्याच्या बाजूने होते. गव्हर्नर दास यांनी जोर देऊन सांगितले की, महागाईविरुद्धची लढाई अद्याप संपलेली नाही आणि RBI ने महागाई 2-6% च्या दरम्यान नाही तर 4% वर ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.