कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या वर्षी लॉकडाउनची अंमलबजावणी झाल्यानंतर देशात यूपीआय पेमेंट्स, कार्ड पेमेंट्स आणि मोबाइल बँकिंग यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आज प्रत्येकजण स्मार्टफोनच्या मदतीने डिजिटल बँकिंग सुविधांचा वापर करीत आहे. यामुळे ग्राहकांना पैसे देणे सोपे झाले आहे. परंतु, ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. ऑनलाइन फसवणूक टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वत: जागरूक राहणे. जर ग्राहक थोडेसे जागरूक राहिले, तर त्यांनी कष्टाने कमावलेले पैसे गमावल्यास ते टाळू शकतात.
या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा :
- आपला ओटीपी कोणत्याही कामासाठी इतर कोणालाही देऊ नका.
- असा कोणताही क्यूआर कोड नसतो, ज्यामुळे पैसे मिळवता येतील.
- सोशल मीडियावरील मित्रांशी गप्पा मारताना आपली वैयक्तिक माहिती सामायिक करू नका.
- कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइटवर पेमेंट करण्यापूर्वी त्यांच्या अटी, खासगी धोरण, त्यांची संपर्क माहिती आणि परतावा धोरण (refund policy) काळजीपूर्वक वाचा. तसेच कॉल करून चेक करा की वेबसाइटची सपोर्ट सिस्टम कशा प्रकारची आहे.
- कॉल करण्यासाठी कोणत्याही बँक किंवा वॉलेटचा हेल्पलाइन नंबर Google वर शोधू नका. बँकेच्या किंवा वॉलेटच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तेथील संपर्क माहितीमधूनच नंबर घ्या.
- सरकारी योजनांशी संबंधित कोणत्याही लिंकवर कधीही क्लिक करू नका. माहिती मिळविण्यासाठी नेहमी अधिकृत वेबसाइटवर जा आणि तेथे नोंदणी करा.
- अशी कोणतीही बँकिंग योजना नाही, ज्यात एक ते तीन वर्षांत पैसे दुप्पट होतात, हे लक्षात ठेवा. नवीन योजनेत पैशांची गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदाराचा परवाना आणि आरबीआय पॉलिसी नक्की तपासा.
- नेहमी Play Store आणि संबंधित वेबसाइट वरूनच कोणतंही अॅप किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. मोबाइल आणि सिस्टमच्या फीचर्सचा ऍक्सेस देण्यापूर्वी पॉलिसी वाचा.




