पुणे : घरकाम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हडपसर येथील पांढरे मळा परिसरात राहणाऱ्या या तरुणीने काल (७ मार्च) संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास इमारतीवरून उडी मारली. दरम्यान, आसपास राहणाऱ्या नागरिकांनी तत्काळ या तरुणीला रुग्णालयात नेले. मात्र, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, तब्बू शेख नावाची तरुणी गंगा रेसिडन्सी सोसायटीत घरकाम करत होती. रविवारी तिने सोसायटीच्या गच्चीवर जाऊन उडी मारली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले आणि तिला उचलून जवळील रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून घेतली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलीस अधिक तपस करत आहेत. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.




