पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) मधील उणीवांचा विरोधात आज (26 फेब्रुवारी) देशभरातील व्यापाऱ्यांनी भारत बंदची घोषणा केली. सुमारे 8 कोटी छोटे व्यावसायिक भारत बंदमध्ये सामील होतील. तसेच देशातील जवळपास 1 कोटी वाहतूकदार आणि लघु उद्योग तसेच महिला उद्योजकही यात सहभागी असल्याचा दावा केला जात आहे.
अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) 26 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिक बाजारपेठा बंद राहतील. रस्ते वाहतूक क्षेत्रातील सर्वोच्च संस्था अखिल भारतीय ट्रान्सपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनने कॅटच्या समर्थनार्थ सकाळी 6 ते सायंकाळी 8 या वेळेत चक्का जाम जाहीर केला आहे. कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचे बुकिंग, वितरण बंद राहील. निषेध म्हणून सर्व परिवहन कंपन्यांना उद्या आपली वाहने पार्क करण्यास सांगितले आहे. देशभरातील विविध राज्यात विरोध म्हणून 1500 ठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागू शकतो.
कोणत्या संघटनांचा संपात असेल सहभाग :
ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशन व्यतिरिक्त राष्ट्रीय व्यापार संघटनांनीही मोठ्या संख्येने व्यापार बंदला पाठिंबा दर्शविला आहे. विशेषत: ऑल इंडिया एफएमसीजी डिस्ट्रिब्यूटर्स फेडरेशन, फेडरेशन ऑफ ऍल्युमिनिअम भांडी उत्पादन व व्यापारी संघटना, उत्तर भारत मसाले व्यापारी संघटना, अखिल भारतीय महिला उद्योजक संघटना, अखिल भारतीय संगणक डीलर असोसिएशन, ऑल इंडिया कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन इ. संघटनांनीही व्यापार बंदला पाठिंबा दर्शविला आहे.
काय -काय असेल बंद ?
- अखिल भारतीय व्यापारी महासंघाने म्हटले आहे की 26 फेब्रुवारी रोजी देशातील सर्व व्यावसायिक बाजारपेठा बंद राहतील.
- 1 कोटी वाहतुकांनी 26 फेब्रुवारी रोजी संपची घोषणा केली आहे.
- चार्टर्ड अकाउंटंट्स आणि टॅक्स अॅडव्होकेट्स असोसिएशनने देखील त्यांच्या ग्राहकांना शुक्रवारी कार्यालयात न येण्यास सांगितले आहे, त्यांची कार्यालये देखील बंद ठेवली जातील.




