जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील आणखी एक सुपुत्र सीमेवर शहीद झाला आहे. ३० वर्षीय जवान राहुल लहू पाटील यांना पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असताना आज दुपारी एक वाजता वीरमरण आले आहे. एरंडोल येथेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसस्कर होणार असून मागील दोन महिन्यात जळगाव जिल्ह्यातील चार जवान सीमेवर शहीद झाले आहेत.
पंजाबमधील फजलखां तेथून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर भारत-पाकिस्तानच्या सीमेवर राहुल पाटील हे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव पंजाबहून मुंबई व मुंबईहून जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी आणले जाणार आहे. राहुल पाटील यांना वीरमरण आल्याची वार्ता समजताच संपूर्ण तालुक्यातच शोककळा पसरली.
राहुल पाटील यांनी आज सकाळी साडेसात वाजता त्यांच्या आई व भावाला व्हिडिओ कॉल केला होता. यावेळी त्यांनी पुढच्या महिन्यात परिवारासह घरी येणार असल्याचे सांगितले होते. तसेच पाटील यांनी व्हिडिओ कॉलवर भाऊ व आईला कर्तव्य बजावत असलेले स्थळही दाखविले. एरंडोल येथील शंकरनगर गांधीपुरा परिसरात राहुल यांचे घर असून राहुल हे २००९ मध्ये लातूर येथे लष्करात भरती झाले होते. ते सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) सेवेत होते. पत्नी व त्यांच्या दोन मुलींसह ते पंजाबमध्येच राहत होते. आज (५ फेब्रुवारी 2021) दुपारी दीड वाजेच्या सुमारास एरंडोल त्यांच्या भावाला फोन वरून राहुल हे शहीद झाल्याची माहिती देण्यात आली.




