वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात घेण्यात आलेले काही निर्णय राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बदलण्यास सुरुवात केली आहे. बालकांची त्यांच्या कुटुंबीयांपासून ताटातूट करणारे अमेरिकेतील याआधीच्या ट्रम्प प्रशासनाचे जाचक इमिग्रेशन धोरण बदलण्यासंदर्भातील तीन सरकारी आदेशांवर नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडनयांनी स्वाक्षऱ्या केल्या.
अमेरिकेच्या नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो भारतीयांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. बायडन यांनी या निर्णयाबाबत व्हाइट हाउसमध्ये बोलताना स्पष्ट केलं कि, ‘मी नवीन कायदे तयार करत नाही, तर वाईट धोरण संपुष्टात आणत आहे. नवीन आदेशामुळे कायदेशीर इमिग्रेशन यंत्रणा अधिक न्याय्य, सुव्यवस्थित आणि माणुसकीपूर्ण होईल, यामुळे देश अधिक मजबूत, सुरक्षित आणि संपन्न होईल आणि सीमांचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने होईल.
इमिग्रेशन धोरण बदलण्यासंदर्भातील तीन आदेश :
- ताटातूट झालेल्या कुटुंबीयांची पुन्हा भेट घडवून आणण्यासाठी गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृती गटाची स्थापना करण्यात आली आहे. (बेकायदा इमिग्रेशन रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने ५,५०० कुटुंबीयांची ताटातूट केली होती, त्यापैकी ६००हून अधिक बालकांच्या पालकांचा अद्याप शोध लागलेला नाही.)
- स्थलांतराच्या मूळ कारणावरच तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार
- स्थलांतरितांनी समाजात मिसळून जावे, यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.




