कर्नाटकमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाच महिने १७ जणांकडून बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुलीच्या मावशीचा देखील समावेश आहे. जिल्हा बालकल्याण समिती सभापतींनी ३० जानेवारीला पोलीस ठाण्यात १७ जणांविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दगड फोडणाऱ्या युनिटमध्ये काम करत होती, त्यावेळी गिरीश नावाच्या एका बसचालकासोबत ओळख झाली. त्याने तिच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले. “त्यानंतर त्याने तिचा नंबर अभी नावाच्या आरोपीला दिला. त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. अभीने पीडितेचे फोटो, व्हिडीओ काढले आणि ब्लॅकमेल देखील केलं. नंतर त्याच्या मित्रांनीही पीडितेवर बलात्कार केला.”
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तीन वर्षापूर्वी आईचा मृत्यू झाल्यानंतर मावशीसोबत राहत होती. मुलीवर वारंवार होणाऱ्या बलात्काराबद्दल तिला माहिती होतं. पोलिसांनी तिलाही याप्रकरणी अटक केली आहे. सर्व आरोपींची ओळख पातळी असून पोलीस पुढील तपस करत आहेत.




