पुणे : वानवडी परिसरात पोलीसांनी गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. वानवडी भागातील गंगा सॅटेलाईट सोसायटी ते नेताजीनगर रस्ता ह्या भागात वानवडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी विठ्ठल चोरमोले आणि अमोल गायकवाड गस्त घालत होते. या दरम्यान, त्यांना माहिती मिळाली की तौफिक रझाक शेख (वय २६, रा. नवाजीश चौकाजवळ, मीठानगर, कोंढवा खुर्द) दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी येत आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचून आरोपीला पकडले. झडती घेतली असता त्याच्याकडे ८१० ग्रॅम गांजा आढळला. त्याच्याकडून गांजा, दुचाकी आणि मोबाइल असा अंदाजे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीसांनी सांगितले की, शेखने गांजा कोणाकडून आणला आणि तो कोणाला विक्री करणार होता, ह्या बाबत तपास सुरू आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे व सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, तसेच पोलीस कर्मचारी दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विठ्ठल चोरमोले, विष्णू सुतार आणि अमोल गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीसांनी सांगितले की, या प्रकरणात आणखी व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता आहे आणि त्यांनी तपास सुरू ठेवला आहे. ह्या प्रकारामुळे वानवडी परिसरात पोलीस सुरक्षा व प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. याशिवाय, गांजा आणि इतर प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभाग सतत गस्त घालत असून कारवाई करत आहे.




