लातूर : लातूर-सोलापूर महामार्गावरील अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. अवघ्या चार दिवसांपूर्वी माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या वाहनाचा अपघात याच मार्गावर झाला होता. आज पहाटे पुन्हा एकदा या मार्गावर भीषण अपघात झाला असून, दोन ट्रॅव्हल्समध्ये पाठीमागून झालेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात तुळजापूर-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील आशीव पाटी येथे पहाटेच्या सुमारास झाला. पुण्याहून लातूरकडे येणाऱ्या एका ट्रॅव्हल्सने समोर असलेल्या दुसऱ्या ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. धडकेमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या अपघातात एक बस उलटली असून दुसऱ्या बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत ५ रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलीस अधिक तपास करत असून, चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लातूर-सोलापूर महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि रस्ते सुरक्षा उपाय योजनांची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.




