उत्तर प्रदेश : एका तरुणाने लिव्ह-इन पार्टनरची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीच्या डोक्यात आणि छातीवर गोळी झाडली, असे पोलिसांनी शुक्रवारी (18 ऑगस्ट) सांगितले. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये ही घटना घडली. ऋषभ सिंग भदौरिया असे या आरोपीचे नाव असून पीडितेचे नाव रिया आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला विधवा होती जी पतीच्या मृत्यूनंतर ऋषभसोबत राहू लागली. सुशांत गोल्फ सिटी पोलिस स्टेशन हद्दीतील पॅराडाईज क्रिस्टल अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान, गुरुवारी काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला, त्यानंतर ऋषभने रियाची हत्या केली.
या घटनेनंतर आरोपी पोलिसांना शरण आला. पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्ह्यासाठी वापरलेले पिस्तूल जप्त केले. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.




