नाशिक : नाशिकमध्ये सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर २२ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही प्रवाशांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे, तर काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला आज पहाटे साडेसहा -पावणेसात वाजताच्या सुमारास अपघात झाला. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळली. सप्तश्रृंगी गडावरुन बुलढाण्यातील खामगाव येथे जात असताना बस दरीत कोसळली. खामगाव डेपोची एसटी बस अपघातग्रस्त झाली. यावेळी बसमध्ये २२ जण प्रवास करत होते. यात १६ प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील मुडी या गावचे असून गडावरील ४ प्रवासी आहेत, तर बस चालक व कंडक्टरचा समावेश आहे. बस क्रमांक MH 40 AQ 6259 वर ड्रायव्हर गजानन टपके, कंडक्टर पुरुषोत्तम टिकार होते. अपघातात ड्रायव्हर गंभीर जखमी झाल्याचं खामगाव आगार सहाय्यक कर्मचारी शुभांगी पवार यांनी सांगितले.
बस रात्री सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी होती. पहाटेच्या सुमारास बस गडावरुन खाली यायला निघाली. दाट धुक्याचा परिसर, सातत्याने पडणारा पाऊस आणि घाटात असलेल्या अवघड वळणांमुळे चालकाचा ताबा सुटून बसचा भीषण अपघात झाला. त्यानंतर बचावपथक, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि जखमी प्रवाशांना वणी उपरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, त्यानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
#नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगीगड घाटात एस. टी. बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे, तर या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी… https://t.co/Zolah6E1V6
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 12, 2023




