पुणे : पुणे जिल्हा न्यायालयाने 20 ऑक्टोबर रोजी महिला वकिलांना खुल्या कोर्टात त्यांचे केस व्यवस्थित न करण्यास सांगितले, कारण यामुळे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण होतो. महिला वकिलांना अशा गोष्टी टाळण्याचे सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आक्षेप घेतल्यानंतर शनिवारी ही वादग्रस्त नोटीस मागे घेण्यात आली.
“महिला वकिलांनी खुल्या कोर्टात केसांची मांडणी केल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे, जे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा आणणारे आहे. त्यामुळे महिला वकिलांना अशा कृतीपासून परावृत्त होण्यासाठी सूचित केले जाते,” असे नोटीसमध्ये म्हटले आहे. सुत्रांनी दावा केला की नोटीस केवळ न्यायालयाची सभ्यता राखण्यासाठी होती आणि कोणत्याही भावना दुखावण्याचा किंवा अपमान करण्याचा हेतू यामागे नव्हता. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर वाद होऊ नये म्हणून ही नोटीस मागे घेण्यात आली आहे.
वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी शनिवारी पुढील ट्विट केले. “व्वा आता बघा! महिला वकिलांकडून कोण आणि का विचलित होत आहे,” जयसिंग यांनी त्यांच्या ट्विटमध्ये जोडलेल्या नोटीसच्या फोटोसह म्हटले आहे. नंतर ही नोटीस मागे घेण्यात आल्याची माहितीही इंदिरा जयसिंग यांनी दिली.
Success at last, the notice had been withdrawn
Thank you everyone https://t.co/QfM9vgWMgv— Indira Jaising (@IJaising) October 24, 2022




