नवी दिल्ली : नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (25 जुलै) देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची शपथ घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा (CJI NV Ramana) त्यांना १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ देतील. त्यानंतर त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात येणार आहे. द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती असतील. शपथ घेतल्यानंतर नव्या राष्ट्रपती देशाला संबोधित करतील.
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी 10.15 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. पूर्व राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि निर्वाचित राष्ट्रपती शपथविधी सोहळ्यात संसदेत पोहोचतील. तसेच उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्री परिषदेचे सदस्य, राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि सरकारमधील प्रमुख नागरी आणि लष्करी अधिकारी समारंभास उपस्थित राहतील.
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये समारंभ संपल्यानंतर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील. याठिकाणी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार असून निवर्तमान राष्ट्रपतींचा शिष्टाचार सम्मान केला जाणार आहे.
असा असेल शपथविधी सोहळा
- नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या उमाशंकर दीक्षित लेन या स्थायी निवासस्थानावरून सकाळी साडेआठ वाजता राजघाटावर पोहोचतील.
- येथून त्या 10 मिनिटांनी परततील.
- सकाळी ९.२५ वाजता राष्ट्रपती भवनात जातील.
- सकाळी ९.४२ वाजता राष्ट्रपती भवनात प्रांगण सोहळा होणार आहे.
- त्यानंतर सकाळी 9.50 वाजता राष्ट्रपतींच्या ताफ्यासह निघतील आणि सकाळी 10 वाजता संसद भवनाच्या गेट क्रमांक 5 वर पोहोचतील.
- येथून पीएम मोदी राज्यसभेचे स्पीकर आणि सभापतींना सेंट्रल हॉलमध्ये घेऊन जातील.
- त्यानंतर 10.30 वाजता त्यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली जाईल.
राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली वाहतूक पोलिसांनी एक ऍडव्हायजरी जारी केली आहे. त्यानुसार, ऐतिहासिक सोहळ्यामुळे लुटियन्स दिल्लीमध्ये मोठा जाम होऊ शकतो. या मार्गावर तुमचे कार्यालय असेल किंवा आज तुम्हाला काही कामासाठी जावे लागत असेल तर विशेष काळजी घ्या. कौटिल्य मार्ग, तीन मूर्ती मार्ग, तीन मूर्ती गोल चक्कर, अकबर रोड, गोल मेठी गोल चक्कर, कृष्ण मेनन मार्ग, विजय चौक, के. कामराज मार्गाकडे न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय सुनहरी मशीद चौक, रफी मार्ग, रेल भवन चौक, पार्लमेंट स्ट्रीट, इम्तियाज खान मार्ग, गुरुद्वारा रकाबगंज रोड, पटेल चौक गोल चक्कर, रायसीना रोड, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, मौलाना आझाद रोड आणि मोतीलाल नेहरू मार्ग बंद राहतील.




