India will become a role model in the world with the use of digital technology in the health sector - President Draupadi Murmu

आरोग्य क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या उपयोगाने भारत जगात आदर्श ठरेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देश

मुंबई : डिजिटल तंत्रज्ञान उपयोगात आणण्यामध्ये भारत उत्साहाने पुढे येत आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेची प्रशंसा जगात होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर छोटे शहर आणि गावांना डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडण्यात भारत जगात उत्तम उदाहरण बनले आहे. सप्टेंबर 2021 मध्ये आयुष्मान भारत डिजिटल मिशनची सुरुवात करण्यात आली. डिजिटल तंत्रज्ञानाच्या आरोग्य क्षेत्रातील उपयोगामुळे भारत या क्षेत्रात जगामध्ये आदर्श ठरेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आयुष्मान भव: या 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गांधीनगर, गुजरात येथील राजभवनात करण्यात आले. या कार्यक्रमाचे वेब लिंकद्वारे थेट प्रसारण सह्याद्री अतिथी गृह येथील मोहिमेच्या राज्यस्तरीय कार्यारंभ दिन कार्यक्रमात करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत, अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव नवीन सोना उपस्थित होते.

राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, की देशाने कोविड साथ रोगाच्या काळात खूप चांगल्या कामाचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले. देशातील शास्त्रज्ञ, डॉक्टर, नर्सेस, अन्य आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी तसेच कुशल प्रशासन व नेतृत्वाच्या जोरावर यामधून देश बाहेर पडला. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबविली. लोकसहभागातून अशक्यप्राय वाटणारे हे काम शक्य करून दाखविले.

प्रधानमंत्री क्षय रोग मुक्त भारत अभियानात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कृत करण्याचे काम प्रशंसनीय असून क्षयरोग निर्मूलनात निक्षय मित्र म्हणून काम करणाऱ्या मित्रांचा सन्मानही स्पृहणीय आहे. आयुष्मान भव: मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी लोकसहभाग देण्याचे आवाहनही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी केले.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी मोहिमेची विस्तृत माहिती देत मोहीम यशस्वी करून प्रत्येकाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत